पावसाची यंदा सगळीकडेच दमदार हजेरी लागली होती, त्यामुळे सर्व काही सुरळीत पार पडेल असे वाटले होते, शेतात पेरण्या झाल्या, शेताच्या कडेला, बांधावर रस्त्यावर सर्व रान हिरवे झाले.. तर्हे-तर्हेच्या झाडोऱ्याने शिवार हिरवेगार झाले. पेरलेली रोपे मोठी झाली, आणि आवणी (भातलावणी) करण्याची वेळ झालीय. पण आता नेमका पाऊस दडी मारून बसलाय. याआधी इथे असे कधी झाले नव्हते. पावसाळ्यात पाऊस सुरु झाला कि ऊन काही लवकर दिसायचे नाही. परंतु गेल्या पाच-सहा वर्षांत असे होतेय. पाऊस त्याच्या लहरीवर येतो-जातोय, मागच्या वर्षी तर भात पोटरीत असताना पाऊस कमी झाला आणि अनेक शेतकऱ्यांना हाताला काहीच लागले नाही.
यावेळी, पुन्हा नव्या उत्साहाने शेतकरी कामाला लागलेत परंतु निसर्गाचे सूत्र त्यांच्या हाती नसल्यामुळे ‘पुढे काय होईल?’ हे कोणीच सांगू शकत नाही.
हि कथा आहे, अकोले तालुक्यातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड परिसरातील, थोड्या बहुत फरकाने एकंदरच भातशेती असणारया आजूबाजूच्या जिल्ह्यांतील. गेल्या १० वर्षांत पावसाची अनियमितता, झालेले कमी दिवस यामुळे येथील शेतीत अनेक बदल होताना दिसताहेत. जसे कि राजूर गावाच्या शिवारात जेथे अगदी ४-५ वर्षांपूर्वी भातशेती होत होती, तेथे आता पावसाळ्यात शेतात पाणी साचत नाही म्हणून शेतकरी भुईमुग घेऊ लागलेत. पुन्हा शेतात पिकलेल्या भुइमुगाला पुन्हा बाजारभावाच्या कचाट्यातून जावे लागणार. म्हणजे हक्काचे अन्न म्हणजे भात पिक हातातून गेले आणि भुईमुग या बाजारी पिकावर शेतकरी येऊन ठेपले. हा यामागचा मोठा तोटा.

अशी हि विपरीत स्थिती पहिल्यांदीच आलीय का? तर याचे उत्तर नक्कीच नाही असे देता येईल. आतापर्यंतचा हवामानाचा झालेला अभ्यास हे असे सांगतोय कि, अशी परिस्थिती वारंवार येत राहिली आहे, कमी आणि अनियमित पाऊस, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ असे नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. मग अशाही स्थितीत माणसे जगली कशी? आणि शेती टिकली कशी? याचे उत्तरे कदाचित आपल्याला इतिहासात सापडतील.

म्हणजे माणसाने शेती करायला सुरवात केली असावी ती साधारणतः १०,००० वर्षांपूर्वी. म्हणजे आज वापरात असणारी काही पिके अगदी सुरवातीच्या काळात पण होती, जसे कि अळू. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे हवामान असते हे तर आपल्याला माहितच आहे, त्यानुसार तेथील पिके बदलतात. काही भागातील पिके दुसर्या भागात चांगली निपजतात. अशाच देवाण-घेवाणीतून शेतीचा विकास होत गेला. सुपीक जमीन, योग्य हवामान आणि पाऊस पाणी याच्या जोडीला महत्वाची असतात ती बीजे किंवा बियाणे. हे बियाणे शेतीच्या आरंभी आजूबाजूला उगवलेल्या गवतातून गोळा केली जात असावी. नंतर यातील चांगले उगवणाऱ्या बिया पुढल्या वर्षीसाठी राखून ठेवल्या जात असणार. यातूनच शेतीचा पाया घातला गेला. पुढे कालौघात बदलत्या हवामानाशी मिळते-जुळते, तग धरणारी पिके दीर्घकाळ टिकली. इथे वेगवेगळ्या भागातील बियाणांची आणि पिकांची देवान-घेवाणही झालेली दिसते, त्यामुळे आज आपल्याला आपली वाटणारी अनेक पिके ही मुळची परदेशातून किंवा इतर खंडातून इथे आलेली दिसतात. कालांतराने ती इथे स्थिरावली आणि विकसित झाली. याचे अनेक उदाहरणे सांगता येतील. मिरची किंवा मका, नाचणी ही त्यातलीच काही नावे, अगदी अलीकडे आपल्याकडे आलेले सोयाबीन.

म्हणजे इथे हा मुद्दा समजून घेणे महत्वाचा आहे कि, बदलते हवामान आणि अनिश्चितत हि भारतीय शेतीसाठीही काही नवी गोष्ट नाही. परंतु आताच्या काळात त्याची तीव्रता आपल्याला अधिक भासत आहे. त्याचे मुळ आपल्याला गेल्या काही दशंकातील आपल्या कृतीमध्येच सापडेल का? याचा विचार करूयात.

सर्वात पहिला बदल जो म्हणता येईल तो पिकपद्धतीत. पूर्वी आपल्याकडे वेगवेगळे पिके एकाच शेतात घेतली जायची. त्यात धान्य, कडधान्य, तेलबिया या सर्वांचाच समावेश असायचा. असे हे मिश्र-पिके घेण्यामागे शास्त्रीय आधार होता. शेतातून घरी येणारे अन्न हे घराल्या लोकांची पोषणसुरक्षा जपत आरोग्य उत्तम राखण्यास मदत करत होते. शिवाय शेतीसाठी-गुरेढोरे असायची, त्यांच्याही खाण्याचा प्रश्न यातून सुटत होता. परंतु आता आपण स्वीकारलेल्या एकपिकपद्धतीत आपण पैसा मिळवून देणारे नगदी पिके अर्थात बाजारकेंद्रित शेती करू लागलो.
मग त्यासाठी आपण बाजारातून विकत आणलेले बियाणे, त्यासाठी बाहेरून विकत आणलेली खते आणि बाहेरून आणलेले कीटकनाशके अशा चक्राचा स्वीकार केला. या सर्वात आपण स्वावलंबन, आरोग्य आणि महत्वाचे गमावून बसलो असू तर ते आपले पारंपारिक बियाणे. ज्यांना आपण या नवीन पद्धतीत हद्दपारच करून टाकले.

कुणाला इथे असे वाटू शकते कि, आपण बोलत होतो ते हवामान बदलाविषयी, येथे कोणतेही पिक असले तर काय फरक पडणार? पण तीच तर येथे महत्वाची गोष्ट आहे. आपल्या पूर्वजांनी जपलेले हे बियाणे, अनेक उन्हाळे-पावसाळे खात, निसर्गाच्या बदलत्या लहरींशी सामना करत टिकलेले आहे. हे असे बदल त्यांना नवीन नाही, त्यामुळे या अशा बदलातही रुजायचे व फळायचे हे गुणधर्म त्यांच्यात चांगलेच मुरलेले असतात. शिवाय किडी-रोग यांचा प्रादुर्भाव त्यांच्यावर जास्त प्रमाणात होत नाही. म्हणूनच आजच्या या परिस्थितीत शेतीला पर्याय म्हणजे ही सर्व पारंपारिक बियाणेच आहेत, असे मला वाटते. यासाठी मी मागच्या वर्षीचेच उदाहरण देईल. कामानिमित्त मागच्या काही महिन्यात अकोले आणि जव्हार तालुक्यात फिरण्याचा योग आला. वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांशी चर्चा झाल्या. मागच्या हंगामातील सर्वच ठिकाणातील शेतकऱ्यांचा एक अनुभव सारखा होता, ज्यावर कुणाचेही दुमत नव्हते. ते म्हणजे, ‘ज्यांनी पिशवीचे (बाजारातून बंद पिशवीतून विकत आणलेले बियाणे) भात लावले होते त्यांना अगदीच नगण्य उत्पादन मिळाले तर ज्यांनी पारंपारिक बियाणे पेरले होते त्यांना त्याचे चांगले उत्पादन मिळाले’ या अनुभवावरून शेतकऱ्यांनी आजच्या अनिश्चित हवामानांशी सामना करावयासाठी काय बोध घ्यायचा तो घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *