*शेतमालातील रासायनिक अंश : समस्या आणि उपाय* ????
“हल्ली टोमॅटो, पत्ताकोबी, कोबीफ्लॉवर या फळभाज्या जनतेच्या लाडक्या बनलेल्या आहेत. मात्र, माझा एक शेतकरी मित्र टोमॅटोला ‘विषाचा गोळा’ म्हणतो, कारण टोमॅटो पिकावर अनेकवेळा म्हणजेच आठवड्यातून दोनदासुद्धा विषारी रसायनांची फवारणी केली जाते. मिरची, आलं, काकडी, कोबी इत्यादी भाज्यांचे आणि द्राक्ष, सफरचंदसारख्या फळांचेही थोड्याफार फरकाने असेच असते…”

‘मॅगी’ या पाकीटबंद अन्नामध्ये आढळलेल्या घटकांबाबत देशात भरपूर चर्चा झाली आणि आजही सुरू आहे. मात्र, घराघरांतील उदरभरण हे मॅगी किंवा इतर फास्टफूडपेक्षाही स्वयंपाकघरात शिजवलेल्या विविध अन्नपदार्थांतूनच होते. स्वयंपाकासाठी ज्या भाज्या, धान्य, डाळी, तेल, मीठ वापरले जाते, त्यातही मानवी आरोग्यास घातक असणारे घटक असू शकतात. अगदी विषाचे अंशही असू शकतात. त्याबाबत मात्र कुणीही बोलताना दिसत नाही. शेतात, धान्य साठविणार्‍या गोदामात, प्रक्रिया उद्योगाच्या ठिकाणी अन्नपदार्थांमध्ये विविध कारणांसाठी मिसळले जाणारे रासायनिक घटक दुर्लक्ष करण्याजोगे निश्‍चितच नाहीत. त्याचप्रमाणे कोबी, फ्लॉवर ही हिवाळ्यातील पिके आहेत. मात्र, या भाज्या आजकाल सर्व ऋतूंमध्ये बाजारात दिसतात. अशी लागवड निसर्गानुकूल नसते. बिगर हंगामी आणि पॉलिहाऊसमध्ये पिकवल्या जाणार्‍या भाज्या रोगराईला बळी पडण्याची शक्यता अधिक असल्याने त्यावर रसायनांची फवारणी वारंवार करावी लागू शकते. असा विषारी रसायनयुक्त भाजीपाला ग्राहकांनी नाकारला, तरच शेतातील भाजीपाल्याची ही बिगर हंगामी लागवड थांबेल आणि आरोग्यास पोहोचणारी हानीही कमी होऊ शकेल.

*रसायनांच्या परिणामांची माहिती उजेडात कोण आणणार?*

शेतात फवारणी केल्यानंतर अगदी दुसर्‍या, तिसर्‍या दिवशी तो शेतमाल बाजारात येतो. फवारणी केल्यावर किती काळ असा शेतमाल वापरू नये. याबाबत शेतकरी आणि ग्राहक दोघेही अंधारात आहेत. त्याबाबतीतील नियम असतील, तर ते केवळ पुस्तकातच आहेत. त्यांना उजेडात कोण आणणार? त्यांना प्रसिद्धी कोण देणार? जनहितार्थ, तंबाखूजन्य उत्पादनावर सावधानतेचा इशारा दिला जातो; त्यातून व्यापक जनजागृती होते. अशीच व्यापक जनजागृती रासायनिक खते, तणनाशके, कीटकनाशके या तिन्ही कृषी रसायनांच्या घातक परिणामांसंदर्भात होण्यासाठी कृषी रसायनांच्या वेष्टणावर सावधानतेचा इशारा ठळकपणे दिला गेला पाहिजे, तसेच पैशाच्या पावतीबरोबरच अन्न सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या रसायनांच्या दुष्परिणामांसंदर्भात माहिती देणारे सविस्तर पत्रक स्थानिक भाषेत शेतकर्‍याच्या हातात पडले पाहिजे. मात्र, रसायन उत्पादन करणार्‍या नफेखोर कंपन्या आणि त्यांचे गावोगावचे एजंट व विक्रेते हे अशा प्रकारचे लोकशिक्षणाचे कार्य करणार नाहीत. कारण शेतकरी जागृत झाला, तर अशा कंपन्यांच्या नफ्यावरच आच येईल. म्हणूनच अशा जनहितार्थ कारवाया आपल्या कृषी, आरोग्य आणि पर्यावरण मंत्रालयाकडून केल्या जाव्यात. त्यासाठीसुद्धा ग्राहकांचा दबाव असावा लागेल. आज जनतेला जे अन्न मिळत आहे, ते एका अर्थाने विषयुक्त असून, नाईलाजाने ते ‘विष’ दररोज जनतेच्या पोटात जात आहे, त्याची चिंता कोणालाच कशी नाही? याचे उत्तर जनतेने सरकारला विचारले पाहिजे.

*पर्यावरणस्नेही शेती पद्धतीची आवश्यकता*

शेतीसाठी कोणतेही तंत्रज्ञान वापरले, तरी ते पर्यावरणस्नेहीच असायला हवे. कारण हवा, पाणी, माती हे सजीवांचे मूलाधार आहेत. त्यांच्या आरोग्यावर माणूस, प्राणी आणि अन्य सजीवांचे आरोग्य अवलंबून असते. शेतात विष घातल्यानंतर ते विष अन्न आणि पाण्यात येणारच, गिधाडांपासून गांडुळांपर्यंतचे सर्व जीव बाधित होणारच. याचे भान प्रत्येकाला असायला हवे. माझ्या आजोबांची पिढी शेतातील मुंग्यांना साखर घालत होती. आज मी जमिनीत विष ओतत आहे. शेती म्हणजे साप, विंचू, गांडूळ, मुंग्या, मुंगळे, भू-सूक्ष्मजीव, मासे, खेकडे, बेडूक, पशु-पक्षी, वनस्पती या सर्वांची परिसंस्था (Eco-system) आहे. या परिसंस्थेला बाधा पोहोचली की सर्व अन्नसाखळी कोलमडणार. एकदा साखळी तुटली, तर ती परत जोडणे माणसाच्या आवाक्यातले नाही. म्हणूनच नैसर्गिक संसाधनांचे जतन करणारी पर्यावरणस्नेही शेती पद्धती आवश्यक ठरते.

नैसर्गिक संसाधनांचे जतन करणारी शेती पद्धती विकसित करण्याचे काम भारतात 80 च्या दशकात सुरू झाले. जपानी कृषी वैज्ञानिक श्री. मासानोबू फुुकुओकांच्या ‘एका काडातून क्रांती’ (One Straw Revolution) या पुस्तकाची या कामी मोठी मदत झाली. ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक Bill Mollision च्या Permaculture पद्धतीचाही उपयोग झाला. गुजरातच्या श्री. भास्करभाई सावेंचेही यात प्रचंड योगदान आहे.

‘नैसर्गिक संसाधनांचे जतन करणारी शेती पद्धती’ या झर्‍याचे आज नदीत रूपांतर झाले आहे. जागोजागचे शेतकरी, कार्यकर्ते, अभ्यासकांनी आपआपले स्वयंसेवी योगदान दिले आहे आणि अजूनही देत आहेत. महाराष्ट्रातसुद्धा हे कार्य चांगलेच रूजत आहे, आता गरज आहे ती लोकचळवळीची. दोन-चारशे लोकांनी केलेली सेंद्रिय / नैसर्गिक शेती वाळवंटातील हिरवळीसारखी ठरते, ती दीर्घकाळ टिकण्याची खात्री नाही. शेजारी रासायनिक शेती होत असेल, तर त्याचे अनिष्ट परिणाम माझ्या सेंद्रिय / नैसर्गिक शेतीवर होणारच. पूर्वी हा धोका तेवढा गंभीर नव्हता; पण कीटकनाशकांच्या जोडीला आता तणनाशकांचा वाढता वापर आणि जी. एम. बियाणे या दोन बाबी आल्याने अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. अर्जेंटिनाचे याबाबतचे उदाहरण अतिशय बोलके आहे. सन 2000 ते 2009 दरम्यान जी. एम. खाद्यान्न आणि तणनाशकांमुळे अर्जेंटिनात बालकांमध्ये कर्करोग तिपटीने वाढला असल्याचे निष्कर्ष अर्जेंटिना शासनाने केलेल्या पाहणीतून समोर आले आहेत.

भारतातील परिस्थिती पाहिली की लक्षात येते की, रासायनिक खते, तणनाशके आणि कीटकनाशकांच्या अवशेषांमुळे पंजाबमधील भटिंडा, बटाला परिसरातील एकाही विहिरीचे पाणी पिण्यालायक उरलेले नाही. महाराष्ट्राची वाटचालसुद्धा पंजाबच्या मागोमाग होत आहे. अशा परिस्थितीत शेजारच्या सेंद्रिय / नैसर्गिक शेतांमधील भूजलसुद्धा दूषित होणारच. म्हणून यापुढे एकट्या-दुकट्याने नव्हे, तर संपूर्ण गाव-शिवारात विषमुक्त शेती होणे आवश्यक आहे. दक्षिणेतील राज्यात सेंद्रिय शेतीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये लाखो एकरात रसायनमुक्त कीडनियंत्रण (Non Pestiside Management) सुरू आहे. विषमुक्त सेंद्रिय शेतीच्या दिशेने ते एक मोठे पाऊल आहे. सिक्कीम सरकारने त्यांच्या राज्याला ‘सेंद्रिय राज्य’ म्हणून घोषित केले आहे. राजकीय इच्छाशक्ती जागली, तर महाराष्ट्रातसुद्धा हे सहज शक्य आहे. सेंद्रिय शेतीचे महाराष्ट्रात पुरेसे यशस्वी प्रयोग आहेतच. मात्र त्याला शासनाचे फारसे पाठबळ मिळत नाही. महाराष्ट्र राज्याचे सेंद्रिय शेती बाबतचे धोरण केवळ तोंडदेखले आहे. त्यात अधिकाधिक परिपूर्णता आणून पूर्ण शक्तीनिशी सेंद्रिय शेतीचे धोरण राबवायला हवे. याद्वारे जनतेला विषमुक्त अन्नाची ग्वाही द्यायला हवी.

*सुरक्षित अन्नासाठी ग्राहक गटांची उभारणी*

सुरक्षित (विषमुक्त) अन्न निर्मिती आणि त्याचे वितरण या दोन्हींसाठी शेतकरी आणि ग्राहकांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज आहे. त्यासाठी असे ग्राहक गट तयार झाले पाहिजेत, जे शेतकर्‍यांना विविध (कायदे, तंत्रज्ञान, शासकीय धोरण इत्यादींची) माहिती देतील, मनुष्यबळाची गरज असताना शेतावरील कष्टाची कामे करतील, शेतकर्‍यांना अनामत रक्कम देऊन त्यांची पैशाची नड भागवतील, शेतमाल वितरणाची जबाबदारी सांभाळतील. शेतकर्‍यांना मदत करणार्‍या अशा ग्राहक गटांच्या माध्यमातून जी व्यवस्था निर्माण होईल आणि शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये जे नाते निर्माण होईल, ते ‘माणुसकी’च्या दिशेने जाणारे एक ठोस पाऊल असेल. सुरक्षित अन्नासाठी आग्रह धरणारे ग्राहक गट आज क्वचितच दिसतात. जागोजागी अशा गटांची बांधणी होऊन एकत्रितपणे शासन दरबारी सुरक्षित अन्नासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

_सुरक्षित अन्न आणि अन्नसुरक्षा_

‘सर्वांच्या भरण पोषणासाठी रासायनिक शेती लागणारच. सेंद्रिय शेती केल्यास लोक उपाशी मरतील’, असा प्रचार विविध माध्यमांमधून केला जात आहे. हा प्रचार लोकांमध्ये गैरसमज पसरविणारा आहे. कारण सेंद्रिय शेतकर्‍यांनी रासायनिक शेतीचे उच्चांक मोडल्याची देखील अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत. सेंद्रिय/ नैसर्गिक शेतीमुळे जमीन दरवर्षी सुपीक होत जाते, रासायनिक शेतीत याउलट घडते. रासायनिक शेती सुरूच ठेवल्यास पुढच्या पिढ्यांच्या हातात आम्ही कशा प्रकारची जमीन सोपवू? ती शेती पूर्णपणे वांझ तर नसेल?

सुरक्षित अन्न उत्पादनासाठी सुपीक माती, सुयोग्य वातावरण, पुरेसे पाणी, सूर्यप्रकाश आणि चांगले बियाणे या मूलभूत बाबींची आवश्यकता असते. यापैकी माणसाच्या हातात जे आहे, ते त्याने प्रामाणिकपणे करावे; पण माणूस इथेही चुकतोच आहे. मातीकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शेतकर्‍यालासुद्धा मातीचे महत्त्व (हल्ली) कळत नाही. पाणलोट क्षेत्र नियोजनानुसार प्रत्येक शेतात समतल (कंटूर) बांधबंदिस्ती झाली आणि त्याला समांतर पेरणी केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते. अवर्षण काळात त्याचा विशेष फायदा होतो. याला जैवभार व्यवस्थापन (Biomass Management) जोडल्यास दुधात साखर पडते. पालापाचोळा, काडीकचरा, पिकांचे अवशेष व्यवस्थितरीत्या शेतात परत जायलाच पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर जनजागृती व्हावी लागेल. ‘ज्याचे उत्तम सेंद्रिय खत तयार होते ती वस्तू पेटविणे शहाणपणाचे कसे?’ मात्र उच्चभू्र वस्त्यांमध्येसुद्धा सफाईवाले पालापाचोळा सहजपणे पेटवून देतात. अनेक शेतकरीसुद्धा शेतातील जैवभारास आगी लावून मोकळे होतात. गांधीजींच्या काळात सफाईची व्याख्या केली गेली ती म्हणजे ‘सब चिजों का फायदेमंद इस्तेमाल.’ आजच्या वैज्ञानिक भाषेत यास ‘पुनर्चक्रीकरण’ (Recycling) असे म्हणता येईल. शेतातील, गाव-नगरातील जैवभार योग्यरीत्या वापरले गेल्यास बाहेरच्या खतांची गरजच पडत नाही. पीक चक्र व्यवस्थित सांभाळणे एवढेच त्यासाठी पुरेसे राहील.

पीक चक्राच्याही बाबतीत आपल्या देशात आनंदी आनंद आहे. धानानंतर (भातानंतर) सालोसाल ‘गहू’ हे पीक घेणे कोणत्या शास्त्रात बसते? पंजाबमध्ये असेच सुरू आहे. सेंद्रिय/नैसर्गिक शेतीला अव्यवहार्य म्हणणारेही याबाबत ‘ब्र’ सुद्धा का उच्चारत नाहीत? आज रासायनिक शेतीत प्रचंड गोंधळ सुरू आहेत. ‘एकात्मिक कीड नियंत्रणा’सारखे शासनाचे कार्यक्रम यशस्वीपणे राबविले, तरी विषारी किटनाशकांचा वापर 90 टक्क्यांपेक्षा कमी होईल; तरीही जी. एम. बियाणे आणले जात आहे, ते कशासाठी? एकात्मिक कीड नियंत्रण अभियान शासन मोठ्या प्रमाणावर का राबवत नाही? जी. एम. बियाणांमुळे तणनाशकांचा वापर वाढेल आणि त्याचे दुष्परिणाम अन्नाच्या सुरक्षिततेवर होतील, ही वास्तवता लक्षात घेतली पाहिजे.

*वैज्ञानिकांचे ‘ग्लायफोसेट’ तणनाशकासंबंधीचे घोषणापत्र*

जगभरातील 80 पेक्षा अधिक वैज्ञानिकांच्या गटाने ‘ग्लायफोसेट’ तणनाशकाच्या वापरावर बंदी आणण्याची मागणी केलेली आहे. या गटाने तणनाशकांच्या घातक परिणामांचे पुरावे गोळा केले आहेत. त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केलेला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ‘ग्लायफोसेट’ तणनाशकाचे वर्गीकरण ‘संभाव्य कर्करोगकारक’ असे केले आहे. ‘ग्लायफोसेट’ तणनाशकाबाबत माहीत झालेल्या बाबींपैकी हा एक अल्प भाग आहे. ‘ग्लायफोसेट’च्या दीर्घकाळ संपर्कात आल्याने फक्त कर्करोगच नव्हे, तर वांझपण, नपुंसकता, गर्भपात, जन्मजात दोष, संप्रेरकाची (Hormone) तोडफोड, मूत्रपिंडाचे विकार असे अनेक आजार होण्याची शक्यता असते.मानवी आजाराशिवाय ‘ग्लायफोसेट’ तणनाशकाचा संबंध 40 नव्या आणि पुनरागमन झालेल्या (पिकांच्या) आजाराशी जुळतो. संपूर्ण अन्नसाखळीलाच ‘ग्लायफोसेट’मुळे बाधा पोहोचते. संपूर्ण वनस्पती जगतात पिकांना आणि जमिनीला अन्नद्रव्य पुरविणारे सूक्ष्मजीव, मासे आणि अन्य जलचर, उभयचर, (बेडूक, कासव, खेकडे इत्यादी) मधमाश्या, पक्षी, सस्तन प्राणी आणि मानवी शरीरातील सूक्ष्मजीव (Human Microbiome) यावर घातक परिणाम होतो.आपल्या देशात ‘तणनाशके’ सुरक्षित आहेत, असा प्रचार करून ती शेतकर्‍यांच्या माथी मारली जातात. ती वापरण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. याविरुद्ध कोण आवाज उठविणार? ग्राहक राजा, तूच काहीतरी कर, जागा हो! अन्यथा ‘सुरक्षित अन्न’ स्वप्न ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *