ऊठसूट जुलाब थांबवायसाठी गोळ्या घेतल्या तर पोटातले ऊपयुक्त जीवाणू मरून जातात. पचन आणखी बिघडते. म्हणून शरीराशी बोला. त्याला कशाची गरज वाटतेय ते विचारा, एकदा का माणसं अशी शरीराच्या भाषेप्रमाणे वागायला लागली, तर मग डॉक्टरही नको, गोळ्याही नकोत.

२८ फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन, त्यानिमित्ताने थोडं ताकामागचं ज्ञान-विज्ञान

दही लावणं ही कला आहे. पण सुगरणी दही ऊत्तम लावतात ते नकळत त्यातील शास्त्र पाळून. त्या काय करतात मी माझ्या आईवरून सांगते. आई दूध तापवायची, त्याचं तपमान काटापाणी झालं की दह्याचं १ चमचा विरजण हळूच सोडायची. आणि दह्या साठी खास चीनी मातीचा सट होता आमच्याकडे. ऊभा, पसरट दोन्ही होते. आहेत अजूनही. भांडं गरम ऊबदार राहील असं ठेवायची. विरजणाचं काहीतरी बिनसलं तर  नेहमी आजी कडून विरजण आणायची, शेजारून विरजण आणताना मी कधीच पाहिलं नाही. आजीचं विरजण कायमच मस्त असायचं, नि सायीचं दहीसुध्दा.

पुढे त्यातील शास्त्र कळलं. दही विरजण लावल्यावर ऊबदारच हवं, नाही तर जीवाणू वाढणार कसे? परवा भाचीने सट मागितला तेव्हा सारं आठवलं. विरजण लावल्यावर दूध घुसळायचं तरी किंवा आधीच सर्व बाजूकडून विरजण लावून घ्यायचं. म्हणजे मग छानच लागतं दही. ऊन्हाळ्यात ३/४ तासातही लागतं. थंडीत मात्र चोवीस तासही लागतात. तपमानाचा फरक दुसरं कायं?

एकदा  माझ्याकडे विरजण नव्हतं, पण दूध खूप होतं. मला तर दही खायची हुक्की आली होती, कारण थालीपिठं केली होती. मग कधीतरी वाचलेलं आठवलं, “लाल किंवा हिरवी मिरची ऊभी चिरून दुधात घाला”. मी घातली तशी नि काय लागलयं दही! वा मस्त! नंतर आत्ताआत्ता यू ट्यूबवर पाहिली ही पध्दत. यापुढे कुणाकडे मागायला नको म्हणून ही फार आवडली. चांदीच्या नाण्याचंही करून बघितलं. नाही लागलं. पण ते विरजण वापरून पुढचं दही मात्र छान लागलं.

दह्याच्या उपयुक्ततेबद्दल काय लिहावं? सर्वांनी दही खायला हरकत नाही, दह्या पेक्षा दह्याची निवळ व ताक चांगलं. पण ताक सुध्दा मिक्सरचं नको. घुसळलेलंच हवं, तरच त्यात ताकाचं ताकपण येतं. मिक्सरला ती चव नाही, पातळ बेचव ताक ते. मला ताक करताना गणित लागायचं. शेवटी मी शोधून काढलं १०० वेळा घुसळलं की साधं ताक छान होतं, सायीच्या ताका साठी ५०० वेळा घुसळावं लागतं. ताक सुध्दा लयीत घुसळलं तर त्या घुसळण्याच्या बदलत्या आवाजावरून कळतं ताक होत आलंय का ते. इतकं सुगरणी  अचूक सांगू शकतात. घुसळण्याने हातावरचे दाबबिंदू छान दाबले जातात. त्यामुळे निराशेचा विकार टाळता येतो, म्हणूून एका मैत्रीणीचा नवरा तिला ताक घुसळून द्यायचा. किती छान विचार! करायला हरकत नाही हा उपाय. तर ताक हे जगातील अतिसुंदर ऊपयोगी पेय आहे. साक्षात देवराज ईंद्रालाही ते दुर्लभ अशा आशयाचे एक सुभाषितही प्रसिध्द आहेच.

ताकातले जीवाणू आतड्यातील पचनाला मदत करतात, म्हणून जर बाळाला, लहान मुलांना जुलाब झाले तर ताक द्यायचं. ऊठसूट जुलाब थांबवायसाठी गोळ्या घेतल्या, तर हे ऊपयुक्त जीवाणू मरून जातात. पचन आणखी बिघडते. म्हणून शरीराशी बोला. त्याला कशाची गरज वाटतेय ते विचारा, एकदा का माणसं अशी शरीराच्या भाषेप्रमाणे वागायला लागली तर मग डॉक्टरही नको, गोळ्याही नकोत.

काय मग? आज पासून ताक स्वतः घुसळून प्यायला सुरूवात करणार ना? मीही केलेय. ताकात काय काय घालायचं हे इतर सुगरणींसाठी राखून ठेवलंय, म्हणून इथेच थांबते.

डॉ वृंदा कार्येकर
संपूर्ण स्वास्थ्य सल्लागार
kvvrunda@gmail.com

[अन्नदाता कडून: मराठी शब्दकोषात “buttermilk” या इंग्रजी शब्दाची परिभाषा residue from making butter from sour raw milk, or pasteurized milk, curdled by adding a culture अशी दिली आहे, ती अपुरी आणि लेखिकेच्या वर्णनाच्या तुलनेत फिकी वाटते. https://en.wikipedia.org/wiki/Buttermilk विकिपीडिया हा free and publicly editable encyclopedia असल्यामुळे त्याची लिंक देत आहोत. वाचकांपैकी कुणास यात सुयोग्य बदल करावयाचे असल्यास करता येतील.]

Img. credit: Loksatta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *