खरं तर पर्यावरणस्नेही जीवनशैली वगैरे शब्द वापरण्याची आपल्यावर का येतेय? पूर्वी काय करत होते आपले आईवडिल? त्यांना का नाही असं वाटलं? याचा अर्थ ते पर्यावरण स्नेहीच वागत होते.

मला चांगलं आठवतयं, आमचं नसरापूरला रामाचं देऊळ आहे. त्यामुळे रामनवमीचा ऊत्सव ओघानेच आला, या ऊत्सवात गावजेवण असायचं. पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण असायचं, पळसाच्याच पानाचे द्रोण असायचे व पाणी प्यायला पितळेची भांडी होती, आजही त्यातली काही आहेत शिल्लक. त्या पत्रावळी नंतर गायीच्या पुढ्यात जायच्या. गायी आनंदाने खायच्या. पितळी भांडी विसळून जागेवर जायची पण घासायला गोवऱ्याची राख किंवा माती असायची, कधी चिंचही.

म्हणजे हे सारं वातावरणाशी मिळून जाणं किती सहज असायचं.. पण नंतर प्रगती (?) झाली आमची, नि थर्मोकोलच्या डिशेस आल्या. आज खेड्यात पत्रावळी नसतात. या पर्यावरणाला धोकादायक वगैरे असतात हे त्यांच्या “गावी” नसतं, नुसत्या पोकळ डामडौलातच हे मग्न असतात, सगळं शहरातील लोकांचं अनुकरण. पण स्वतः विचार करणे हे त्यांनी कधीच सोडलंय. चहा प्लॅस्टिकच्या कपात पितील, कप तिथेच टाकायचे ही सवय. कसे नि काय समजावयाचे? मी कधीच त्यामुळे त्यांना सांगायला जात नाही. माझ्यापुरते प्रयत्न करते म्हणजे डोक्याला ताप होत नाही. अन्यथा पर्यावरणस्नेही जीवन जगताना माझा जीव तीळतीळ तुटतो सारं सभोवतीचं पहाताना… साधी पालेभाजीची जुडी बांधायला सुतळ वापरत नाहीत, प्लॅस्टिकची दोरी वापरतात. केरसुणीलाही तेच. पूर्वी असं नव्हतं. शहरात प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी नि खेड्यात मजूर सुध्दा पॉलिथीन पिशवी मागणार, भाजीवाले देणार, ती जपून नाही वापरणार, पुनर्वापर नाही करणार, वापरून झाली की नदीपात्रात, दुसऱ्याच्या दारात टाकणं किती सोपं, तेच करणार! जीवितनदी चळवळी वगैरे फक्त पुण्यात नाही तर महामार्गानजिकच्या साऱ्या गावांचा हा प्रश्न आहे, तिथेतिथे व्हायला हवी. पण मला नाही वाटत असं काही आमच्या गावात घडेल. तुमची बुध्दी, शक्ती कितीही खर्च करा, ही मानसिकता कधीच बदलत नाही, हाच आजवरचा अनुभव आहे. म्हणूनच मी जग सुधारायच्या फंदात पडत नाही. मी माझ्या पुरतचं पहाते. माझी एकांडी वाट चोखाळत रहाते.

आता केळीच्या सोपटापासून डिश बनवल्यात, सुपारीच्या झाडांपासून ही डिश बनवतात. त्या किमान मोठ्या जेवणावळीला वापरायला काय हरकत आहे? थोड्या महाग पडतात पण धुवायचं पाणी वाचवायचं तर हा खर्च सहज झेपतो. गायवाल्याचाही गायीच्या एका जेवणाचा खर्च वाचतो, त्यांनी तो दिला तर हा प्रश्न वाटतो तितका अवघड वाटणार नाही. पण??

नेहमी प्रमाणे मी पण आपलंच उत्तरही सुचवलयं, आचरण तसं करतेय, आणखी काय हवं? काही सुचलं तर जरूर सांगा. वाट बघते.

डॉ वृंदा कार्येकर
संपू्र्ण स्वास्थ्य सल्लागार
kvvrunda@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *