निसर्ग ऊर्जादायी पध्दतीने काम करतो. माणूस ऊर्जाक्षयी पध्दतीने.

निसर्ग काहीच वाया घालवत नाही; माणूस सर्व गोष्टी वाया तर घालवतोच, वर ऊधळपट्टीही करतो. निसर्गाचा एक भाग असूनही त्याच्या नियमांप्रमाणे पालन करण्याचं जेव्हापासून माणसाने सोडलं तेव्हापासून मनुष्याची अधोगती सुरू झाली. भले त्याला त्यात प्रगती वाटत असेल, ही खरे तर अधोगतीच. निर्मिती करणं एकवेळ सोपं असतं पण त्या निर्मितीनंतरचा पसारा आवरणं? त्याची योग्य वासलात, व्यवस्था लावणं, हे फार अवघड. उदाहरणच घ्यायचं तर कापडाचं घेऊ. माझी एक मैत्रीण लहान मुलांचे कपडे शिवते. ती मला एक दिवस म्हणाली, “माझ्याकडच्या चिंध्यांचं काही करता येत असेल तर बघ”. मी ४ मोठया पिशव्या चिंध्या घेऊन घरी आले.

त्याच्या विविध प्रकारच्या पिशव्या शिवल्या, छोटी छोटी दुपटी शिवली. निरनिराळ्या शोभिवंत वस्तू केल्या; सारं वाटून टाकलं, तरी चिंध्या संपेनात. शेवटी गोळे करून चुलीत जाळले सुध्दा. अखेर एक कल्पना सुचली. जुन्या गाऊनची एक गादीची खोळ केली. त्यात त्या चिंध्या भरल्या, गादी म्हणून कॉटवर सर्वात तळाला टाकली. १-२ महिने बऱ्यापैकी दबली गेली नि चक्क गादीवाला जसे टाके घालतो तसे टाके घातले चिंध्यांची ती गादी मी आजही वापरतेच आहे!

मधेमधे तर हा जुन्या गोष्टींची विल्हेवाट कशी लावायची हा विचार इतका टोकाला गेला की नवीन वस्तू घेताना मला पुढचचं दृष्य दिसायला लागायचं. विचार पक्का रूजायचा, मगच मी कापड, कपडे खरेदी करायची. मागे एकदा मी वेलवेटचं जाकीट शिवलं होतं, त्याच्या ऊरलेल्या सर्व तुकड्यात मी पावडर लावायचे पफ शिवले होते. एकही चिंधी वाया न घालवता सर्व गोल, चौकोनी, त्रिकोणी आकाराचे… तेव्हा कुठे कापडाचा उपयोग झाल्यासारखा वाटला.

फळांचंही तेच. कलिंगड आणणं तर मजेचचं काम. त्याचा लाल गर खायचा, पांढऱ्या भागाची किसून थालीपिठे करायची, बिया वाळवून पूड करून दुधात घालून खायची, वरचं टरफल किसून त्याची चटणी तरी करायची नाहीतर ऊटण्यात मिसळायचं. अगदी ऊरलचं तर झाडांना खाऊ, त्यांनाही चवीत बदल. एवढं केलं की मग निसर्गाचा एक नियम पाळल्याचा मला आनंद व समाधान मिळायचं. आपला आनंद आपणच शोधायचा हेही मग मला आपसूक कळायला लागलं.

डॉ वृंदा कार्येकर
संपूर्ण स्वास्थ्य सल्लागार
kvvrunda@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *